जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. नंदूरबारमधील जात प्रमाणपत्र तपासणी समितीने नुकतेच सौ. सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.
जळगावातील चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणाहून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर समितीसमोर सुनावणी करण्यात आली. त्यानुसार तपासणी समितीने बुधवारी याबाबत निकाल देत लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे अनूसुचित प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. तसेच ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान या निकालाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली आहे.