मुंबई (वृत्तसंस्था) अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाच्या काळात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेणे अनावश्यक आणि धोकादायक असून दहावीच्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश करण्यात यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अकरावीच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत राखून ठेवला होता. कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी सीईटी पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी अधिसूचना २८ मे रोजी काढण्यात आली होती. आज निकाल देताना हायकोर्टाने ही अधिसूचना रद्द केली आहे. तसेच सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे हे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या आठवड्यापर्यंत १० लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली होती.
सरकारला धक्का
न्यायालयाचा सीईटी रद्द करण्याचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पूर्ण निकाल अद्याप आपल्याकडे आला नसून नेमक्या कुठल्या कारणांमुळे सीईटी घेण्याला न्यायालयाने विरोध केला, याची माहिती घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.