चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चहार्डी ग्रा.पं.स पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळण्यासाठी आम आदमी पक्षाचे तालुका उपसंयोजक मुकुंदराव पाटील व गावातील दिव्यांग बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.
तालुक्यातील नंबर २ ची लोकसंख्या असलेली चहार्डी ग्रा.पं. कार्यालयाचे कामकाज पुर्णवेळ होत नाही, ग्रामसेवक सतत गैरहजर असतात, ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरु असून नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाही. ग्रा.पं. कार्यालय दुपारी १२ वाजेनंतर बंद राहते. नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जसे की, उतारे, दाखले वेळेवर मिळत नाहीत. गावातं स्वच्छता, साफसफाई होत नाही, गटारी व सार्वजनीक शौचालयांची सफाई होत नसून मैला उघडयावर वाहून नदीत जातो त्यामुळे पाणी दुषीत होवून नागरिकांच्या आरोग्य व गावातील पशुधन यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच गावातील कुपनलिकेच्या पाण्याचा रिपोर्टपण दुषीत आला असुन ग्रा.पं. कडे त्यांचा रिपोर्ट जमा आहे परंतु कोणतीही कार्यवाही नाही. तसेच ग्रा.पं. कार्यालयातील कामगारांचे पगार थकीत आहेत. त्यामुळे कामगार कामावर येण्यास विलंब होतो, पाणी पुरवठा वेळेवर होत नाही, तसेच गावात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असुन साथीचे आजार उदभवू शकतात. दिव्यांग बंधु-भगिनींना दिव्यांग निधी मिळाला नसून त्यापासुन ते वंचित आहेत. या सर्व सुविधांसाठी चहार्डी ग्रा.पं. तीस पुर्णवेळ व निवासी ग्रामसेवकाची नेमणूक व्हावी जेणेकरुन नागरिकांची कामे वेळेवर होतील.
यासाठी आम आदमी पक्षाचे तालुका उपसंयोजक मुकुंदराव पाटील व गावातील दिव्यांग बंधू ९ ऑगस्ट क्रांती दिवस पासून साखळी उपोषणास बसले आहेत. आज स्वातंत्र्य दिनी साखळी उपोषणाचा ७ वा दिवस आहे तरी देखील शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाहीय. सदर साखळी उपोषणास आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी, योगेश हिवरकर, योगेश भोई, विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा उपसंयोजक ) , आर डी पाटील ( शिक्षक आघाडी – जिल्हाध्यक्ष ) , समाधान बाविस्कर ( तालुका संयोजक ) , सुधीर पाटील ( शहर संयोजक ) आदिंनी साखळी उपोषण स्थळी भेट देऊन गावातील समस्या जाणून घेतल्या आहेत. येत्या काळात जर शासनाने पूर्ण वेळ ग्रामसेवकांची नियुक्ती केली नाही तर जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.