अयोध्या (वृत्तसंस्था) आज राज्यातील शिवसेना-भाजपचे मंत्री आमदार आणि खासदार अयोध्येत पोहोचले आहेत. यावेळी अयोध्या येथे सुरू असलेल्या भव्य राममंदिर निर्माण कार्याची पाहणी करत असताना चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे येथील सतीश साहेबराव चव्हाण यांची आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत भेट झाली. ते गेल्या पावणे दोन वर्षांपासून राममंदिराचे बांधकामाचा निविदा मिळालेली कंपनी L&T मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यानिमित्ताने राममंदिर निर्माणात चाळीसगावच्या सुपुत्राचा सहभाग असल्याचे बघून आ.चव्हाण हे भारावून गेले होते.
यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावचा सुपुत्र राममंदिराची उभारणी करण्यात महत्वाचे योगदान देत आहे, ही बाब ना.गिरिषभाऊ महाजन यांना सांगितली असता त्यांनी देखील सतीशदादा यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच सोबत उपस्थित असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्री, आमदार यांना त्यांची “आमच्या जिल्ह्याचा माणूस” म्हणून ओळख करून देत सतीश चव्हाण यांचे कौतुक केले.
ही बाब केवळ आमच्या चव्हाण परिवारासाठी किंवा हिंगोणे गावासाठीच नव्हे तर सर्व चाळीसगाव वासीयांसाठी अभिमानाची आहे की, आपल्या भूमीपुत्राचे योगदान राममंदिर निर्माणात लाभत आहे व त्याचे कौतुक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्वच मंत्री करत आहेत. सतीश चव्हाण हे गेल्या २८ वर्षांपासून L&T कंपनीत कार्यरत असून त्यांचे शिक्षण चाळीसगाव येथेच झालं आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या रामकार्यासाठी शुभेच्छा दिल्या व भव्य श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यानंतर चाळीसगाव वासीयांसह भेट देण्याचा शब्द घेत निरोप दिला.