चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विधानभवन अभ्यास दौरा आयोजित केला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने दि.२० मार्च रोजी मुंबई विधानभवनाला विद्यार्थ्यांनी भेट दिली तसेच विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजाचा प्रेक्षक गॅलरीत बसून प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ज्या नेत्यांना आपण विधिमंडळात बोलताना, जनतेचे प्रश्न मांडताना, विविध विषयांवर आक्रमक होताना फक्त टीव्हीवर पाहतो. त्या नेत्यांना प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होताना पाहता आल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. विधानभवन भेटी नंतर सदर विद्यार्थ्यांसोबत जवळच असणाऱ्या स्टेट्स रेस्टॉरंट येथे स्नेहभोजन केले व तद्नंतर त्यांच्या बस “आपली मुंबई” दाखविण्यासाठी रवाना झाली.
या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सदर विद्यार्थ्यांना आलेला अनुभवातून अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या असतील व त्यातून त्यांच्या जीवनाला थोडी जरी सकारात्मक अशी नवी दिशा देता आली असेल तरी हा दौरा सफल झाला असेल असे मी मानतो, अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केली. सदर दौरा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणारे प्रा.डॉ.राजू निकम व विद्यार्थ्यांच्या टीम लीडर यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मनापासून आभार मानले.