मुंबई (वृत्तसंस्था) किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. तसेच किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. एवढेच नव्हे तर मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा मोठा गौप्यस्फोट देखील हसन मुश्रीफांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या हा वाद चांगलाच चर्चेत आहे.
आज सकाळी किरीट सोमय्यांना कोल्हापूरला जाण्यासाठी रोखल्यानंतर सोमय्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफांवर घोटाळ्याचे आरोप केले होता. सोमय्यांच्या या आरोपांवर मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, भाजपवर टीकेची तोफ गाडली आहे. ‘मी १०० कोटीचा दावा ठोकणार आहे, तो दावा तयार होत आहे. आजच्या कथित घोटाळ्याबाबत केलेला आरोप इतका बिनबुडाचा आहे की सोमय्यांच्या सीएची पदवी शंकास्पद आहे. सोमय्यांनी अभ्यास करावा. मी सीए पाठवतो, ते पाहून घ्या,’ असा टोला मुश्रीफांनी लगावला आहे.
तसंच, ‘ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा आणि माझ्या जावयांचा सूतराम संबंध नाही, असं स्पष्ट करतानाच मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल १ लाख आहे, मग १०० कोटीचा घोटाळा कसा होईळ? २०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता १० वर्षासाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात २०२० ला दिला,’ असं मुश्रफांनी म्हटलं आहे. त्यामुळे किरिट सोमय्यावर 100 कोटींचा पहिला आणि 50 कोटींचा दुसरा अब्रुनुकसानीचा दावा मी करणार आहे. किरिट सोमय्यांनी घोटाळेबाज, भ्रष्टाचारी अशा बदनामीकारक शब्दांचा वापर केला आहे. त्याविरोधातही आम्ही न्यायालयात जाणार आहोत. असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.