चंद्रपूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर वरोरा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोकर यांचे 27 मे रोजी निधन झाले होते. त्यानंतर बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली. आजारपणामुळे 28 मेला वडिलांच्या अंत्यविधीमध्येही ते उपस्थित राहू शकले नव्हते. चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला होता. सुरुवातीला बाळू धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथे उपचारासाठी नेण्यात आले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेसचा पराभव झालेला असताना बाळू धानोरकर यांनी विजयश्री खेचून आणत राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बनले.