मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त विधान करुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांच्या या विधानावर त्यांना प्रयत्न समोर बसलेल्या काही व्यक्तींनी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही किंवा अनावधानाने बोललो, असंही म्हटलं नाही.
मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. पर्यटनमंत्री तथा भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेशी केली. या सर्व टीका-विधानांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. तशात आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असं विधान त्यांनी केलं. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल… पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं ते प्रसाद लाड म्हणाले. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचं बालपण रायगडावर गेले, असं प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असंही लाड म्हणाले.
राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद लाड बोलताना दिसत आहेत. ‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड करताना दिसत आहेत. याच विधानाचा आधार घेत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.