मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आज आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कालपासूनच बरे वाटत नव्हते. गेले काही दिवस ते सतत दौरे करत असल्याने त्यांना आज अस्वस्थ वाटत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. नाशिक, औरंगाबाद यासह अन्य ठिकाणी दौरे सुरू आहेत. आजही त्यांचा दौरा ठरलेला होता, पण अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला दौरा यासह सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी संदर्भात दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतू राज्यातील सत्तासंघर्षांचा पेच काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.