मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील लसीकरण मोहीम आणि कोरोना प्रतिबंधासाठी राज्याची तयारी याबाबत मुख्यमंत्री बोलणार असल्याची शक्यता आहे.
उद्या महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण आलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा शिकून राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेसाठीही तयारी सुरु केली आहे. यासर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री आज राज्यातील जनतेशी संवाद साधू शकतात.
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.