धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत पुस्तके वाटप करण्यात आली. तालासुरात झालेले स्वागत आणि नवीन कोऱ्या पुस्तकांच्या सुगंधाने मुलं हरखून गेली, आनंदीत झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ,पर्यवेक्षक कैलास वाघ , वसंत चौधरी यांची उपस्थिती होती.त्यांच्या आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, संयोजन तथा आभारप्रदर्शन बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बापू शिरसाठ व विज्ञान शिक्षक नवनीत सपकाळे यांनी केले. संजय मोरे, वंदना सोनवणे यांच्याकडून मिठाई वाटप करण्यात आली.
















