चोपडा (प्रतिनिधी) बनावट वेबसाईड तयार करून एका १८ वर्षीय तरुणाची ३ लाख ९१ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात करण सुभाष पाटील (वय १८, रा. गणेश कॉलनी चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १९ मे २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीमध्ये मोबाईल क्रंमाक +६३९१६४०४८९६७ व +६३९२७२७२२३१२ (नाव गांव माहित नाही) यांनी करण पाटील यांना Shopee pay या वेबसाईडवर www.onsw६९.com ही बनावट लिंक तयार केली. तसेच +६३९१६४०४८९६७ या व्हॉट्सॲप मोबाईल क्रंमाकावरुन करण याच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर https://marchentsentar.com/pages / register/ register ? pcode= VXNUVCAZ ही लिंक पाठवून करणला Shopee pay या वेबसाईडवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. तसेच करण याने सदर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले. यानंतर सदर मोबाईल धारक यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे त्यांनी दिलेल्या वरील गुगल पे या युपीआयडीवर करण याने एकुण ३,९१,५९५ रुपये जमा केले. त्यानंतर जमा केलेले पैसे व त्यावरील कमिशन असे एकूण ५,२८,७९४.६ एवढी रक्कम जमा झाली.
दरम्यान, करण याने सदर रक्कम विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता सदरची रक्कम विड्रॉल होत नसल्याने वरील मोबाईल धारक यांना सदर रक्कम करण याने वडीलांच्या सेट्रल बँक खात्यावर जमा करण्यासाठी सांगितली. सदर मोबाईल धारक यांनी करण याला ३१ हजार रुपये जमा केल्याशिवाय Shopee pay या वेबसाईडवरुन तुम्हाला जमा केलेले पैसे काढता येणार नाही, असे सांगून करण याची सदर वेबसाईडवर जमा केलेले पैसे देण्यास नकार दिला. तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून खोटी वेबसाईड तयार करून करण याचा विश्वासघात करून एकूण ३ लाख ९१ हजार ५९५ एवढ्या रक्कमेची फसवणूक केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात दोन मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करीत आहेत.