चोपडा (प्रतिनिधी) येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धक्के मारून बाहेर काढण्याची आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते, अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप नेवे यांनी नुकतीच केली आहे.
दिलीप नेवे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, शहरातील ज्ञानेश्वर रामदास शिंदे यांनी सन २०२०ला शेतकरी असल्याचा दाखला मिळणेबाबत अर्ज केला आहे. तीन वर्षात चोपडा तहसील कार्यालयाने या संदर्भात कोणताही निर्णय वा उत्तर दिलेले नाही. म्हणून शिंदे यांनी २३ नोव्हेंबर २३ रोजी या संदर्भात पूर्वी केलेल्या अर्जावर माहिती अर्ज सादर केला. तरीही चोपडा तहसील कार्यालयाने त्यांची कोणतीच दखल घेतली नाही. म्हणून २८ डिसेंबर २३ रोजी त्यांनी प्रथम अपील केले. त्या अपीलाची सुनावणी आज प्रथम अपीलीय आधीकारी तथा तहसीलदार थोरात यांच्याकडे होती. त्यासाठी अपीलार्थी शिंदे यांनी मला आधिकार लिखित पत्र दिलेले आहे.
दरम्यान, अर्धा तास उशिरा येणारे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पुकारा केल्यानंतर आत गेलो असता तहसीलदारांचा पारा वाढला. तुम्ही सगळ्यांचे उक्ते घेतले आहे काय? असे म्हणत त्यांनी अरेरावी केली. तर त्यांनी आम्हा ज्येष्ठ नागरिकांना धक्के मारण्याची भाषा केली. तसेच ३५३ कलमा खाली कारवाई करण्याची धमकी दिली. सामान्य नागरिकांना, सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धक्के मारून बाहेर काढण्याची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. या विरोधात पुढील महिन्यात तहसीलदार कार्यालय परिसरात संसदीय पध्दतीने आंदोलन करणार असल्याचेही दिलीप नेवे यांनी निवेदनात म्हटले आहे.