जळगाव (प्रतिनिधी) शहरातील द्रौपदी नगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १५ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली असून, दुपारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष सीताराम पाटील (वय ६८, रा. द्रौपदी नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह राहतात. १४ ते १५ ऑगस्टदरम्यान त्यांचे घर बंद होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
घर उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच सुभाष पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.