मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याला देशात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शेतकरी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राजू शेट्टी यांनी पवारांकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, अशी खंत राजू शेट्टी यांनी पवारांकडे व्यक्त केली.
नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, असं राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना सांगितलं. त्यावर पवारांनी याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असं आश्वासन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं.
राजू शेट्टी यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी यावेळी अजित पवार यांनं दिलं. केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आजची भेट असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. तसंच या कायद्यावर महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असं राजू शेट्टी अजित पवार यांना म्हणाले.
आज श्रीमती मेधा पाटकर, राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले, असं ट्विट करुन पवारांनी भेटीचा तपशील सांगितला.