जळगाव (प्रतिनिधी) राज्यात कोरोनाला काही प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशनानुसार जिल्हा प्रशासनाने अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बर्याच प्रमाणात शिथीलता आणि काही निर्बंध कायम ठेवून आदेश निर्गमित केले आहेत.
राज्यात पुन्हा अनलॉक करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ज्याअर्थी, शासन आदेश दि. ४ जून, २०२१ नुसार जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हा दोन्ही निकषांची पूर्ततेनुसार पाच स्तर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जळगाव जिल्हयातील निर्बंध हे दर आठवड्यांच्या आकडेवारीनुसार या पाच स्तरात लागू राहतील.
पाच स्तर नेमके कसे आहेत?
पहिला स्तर : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील तर
पाचवा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
जारी केलेल्या निर्देशानुसार खालील प्रकारे अनलॉक :
१) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र यासाठी सॅनिटाईझोनसह अन्य नियमांचे पालन करावे लागले. दुकानात एका वेळी पाच पेक्षा ग्राहक नसावेत याची काळजी घ्यावी लागेल. दुकानाच्या दर्शन भागामध्ये बँकेप्रमाणे काऊंटर लाऊन काच अथवा प्लास्टीकची पारदर्शक शीट लावावी लागणार आहे.
२) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे : ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.
३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.
४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग : पूर्ववत सुरू करण्यात येतील.
५) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.
६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील.
७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.
८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.
९) विवाह व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.
१०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी.
११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी.
१२) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत.
१३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.
१४) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू.
१५) माल वाहतूक : पुर्ववत सुरू.
१६) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग आहे त्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास आवश्यक राहील.
१७) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार.
१८) सार्वजनीक ठिकाणी वावरणे : कोणतीही बंदी नाही. म्हणजेच संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आलेली आहे.
१९) कृषी विषयक कामे व दुकाने : नियमीतपणे सुरू.
२०) ई-कॉमर्सचे व्यवहार : नियमीतपणे सुरू राहणार.
जिल्हाधिकार्यांनी अनलॉकचे निर्देश जारी करतांना नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर, फिजीकल डिस्टन्सींग, सॅनिटायझेशन आदींचे नियम पाळावे लागणार आहेत. तसेच जळगाव जिल्ह्याचा पॉसिटीव्हिटी दर ५ % किंवा अधिक झाल्यास किंवा ऑक्सिजन बेडची २५% पेक्षा जास्त झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येईल.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.