जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना जात प्रमाणपत्र वेळेत सादर करता येवू नये, यासाठी राजकिय हस्तक्षेप करण्यात आला होता. त्यांनी अनेक चकरा मारून देखील समितीकडून जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्या अपात्र झाल्यात. मात्र अपात्रतेच्या कारवाई नंतर त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले, असा आरोप अधिवेशनात चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणी थेट स्थगिती मिळविण्यात यश मिळवल्यामुळे मुक्ताईनगरसह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आ. मंगेश चव्हाण यांनी वेधले सभागृहाचे लक्ष !
सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा तडवी यांच्या जात प्रमाणपत्रा संदर्भातील विषय मांडला होता. आ. चव्हाण यांनी अधिवेशनात जात प्रमाणपत्राच्या विषयावर बोलतांना सभागृहाचे लक्ष वेधले. आ. चव्हाण म्हणाले की, राजकारणात आल्यानंतर अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न असते. कधी नव्हे ती संधी मिळते. शासनाने निवडणूका झाल्यानंतर ग्रामपंचायत, जि.प, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची वेळ दिली जाते. मात्र ते वेळेत दिले जात नाही. मुक्ताईनगर नगराध्यक्षा तडवी यांनी समितीकडे चकरा मारून देखील जात प्रमाणपत्र मिळाले नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे समितीने दिले नाही. मात्र अपात्र झाल्यावर ते देण्यात आले. जे लोक जनतेतून निवडून येत नाही, ते लोक निवडलेल्या लोकांना असा त्रास देतात असा टोला त्यांनी खडसे यांचे नाव न घेता लगावला होता. या प्रमाणपत्रासाठी लाख दोन लाख रूपये दयावे लागतात, असाही आरोप त्यांनी केला होता.
एका महिला लोकप्रतिनिधीला न्याय, मिळवून देऊ शकलो, याचे आत्मिक समाधान !
दरम्यान काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लढ्याला आज यश मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्याने एका महिला लोकप्रतिनिधीला न्याय, मिळवून देऊ शकलो, याचे आत्मिक समाधान शब्दात व्यक्त करण्यासारखे नसल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडील ०७ ऑगस्ट रोजी सुनवाईतही आम्हाला संपूर्ण न्याय मिळेल, याशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दुध संघाच्या निवडणुकीतही आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला मतदार संघ सोडून थेट मुक्ताईनगर मतदार संघातून निवडणूक लढवीत विजयश्री खेचून आणला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा अपात्रतता प्रकरणात पाठपुरावा करून ‘मिशन मुक्ताईनगर’ फत्ते केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हटलेय आदेशात !
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलमान्वये श्रीमती सुरेखा अफजल तडवी उर्फ नजमा इरफान तडवी, मुक्ताईनगर, जि. जळगांव यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने, त्यांना मुक्ताईनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून पुढे चालु राहण्यास अपात्र घोषित करण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी, जळगांव यांचा दि.०८.११.२०२१ रोजीचा आदेश रद्द करण्यासंदर्भात श्रीमती तडवी यांनी तत्कालीन मा. मंत्री (नगर विकास) यांच्याकडे दाखल केलेला दि. १७.११.२०२१ रोजीचा अपील अर्ज शासनाच्या विचाराधीन आहे. याप्रकरणी दाखल अपिल अर्जासंदर्भात नैसर्गिक न्यायतत्वावर मा. मुख्यमंत्री यांच्याकडे सोमवार, दिनांक ०७ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता सुनावणी आयोजित करण्यात येत आहे. सदर सुनावणी होईपर्यंत श्रीमती तडवी यांना अपात्र घोषित करण्याबाबत निर्गमित आदेश क्र.पालिका-१/एस.आर.-०८/२०२१, दि.०८.११.२०२१ यांस तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात येत आहे. तरी, मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आयोजित करण्यात आलेल्या सुनावणीस आपण व्यक्तीशः आवश्यक कागदपत्र व संबंधित अधिकाऱ्यांसह कृपया उपस्थित रहावे. सुनावणीचे स्थळ आपणास स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही स्थगिती पत्रात म्हटले आहे.