मुंबई (वृत्तसंस्था) अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी “एनसीबी’ने अटक केलेली कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाछिया यांना मुंबईतील न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.
भारती सिंह आणि हर्ष यांच्या अंधेरी येथील घरावर “एनसीबी’ने काल सकाळी छापा घातला. त्यांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. संध्याकाळी या दोघांनाही “एनसीबी’ने अटक केली.
आज दुपारी या दोघांनाही महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे “एनसीबी’चे वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले. न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्यानंतर भारती आणि हर्ष दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत भारती आणि हर्ष यांच्या घरात सापडलेल्या गांजाचे प्रमाण अत्यल्प अहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 1 किलोपर्यंत गांजा जवळ बाळगल्यास तो कमी प्रमाणात मानला जातो, यासाठी 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा आणि 10 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा आहे.
20 किलो अथवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात गांजा बाळगणे हे व्यवसायिक कारण असल्याचे मानले जाते आणि त्यासाठी 2 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद अहे. मात्र 1 किलो ते 20 किलोपर्यंत गांजा बाळगल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.