नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, संकट अद्याप टळलेलं नाही. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४३ हजार १४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४००० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासांत ३,४४,७७६ लोक या विषाणूचा पराभव करण्यात यशस्वी झाले आहेत. तर आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना करोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.
गुरुवारी राज्यात ४२५८२ नव्या रुग्णांची नोंद तर ५४५३५ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेनं डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. काल (गुरुवार) राज्यात ४२५८२ नव्या रुग्णांची नोंद तर ५४५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४६५४७३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४% एवढे झाले आहे.