जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या मनोज अनिल चौधरी यांनी माझ्या आत्महत्येस एसटी महामंडळाची कार्यपद्धती व मराठी माणसाचे ठाकरे सरकार जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले मनोज अनिल चौधरी (वय – ३०, रा.कुसुंबा) हे मागील काही दिवसांपासून कमी पगार व त्यातील अनियमिततेला कंटाळून नैराश्येत गेले होते. आज सकाळी त्यांनी ८ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. आत्महत्यापूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता याच कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळाची कार्यपद्धती व आपल्या मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे म्हटले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी महामंडळाचे अधिकारी येऊन आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतला आहे.