जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज पाचोरा येथे धावता दौरा केला. अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी कृष्णापुरी भागात भेट दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे एका ज्योतिषीकडे हात दाखवायला आले असल्याचीही चर्चा आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळीच जळगावात आले. पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील हे त्यांच्या वाहनाने ना. शिंदे यांना घेण्यासाठी पोहचले. ना. शिंदे यांचा हा खाजगी दौरा होता. पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागात त्यांनी निवडक मान्यवरांसह भेट दिली. पाचोरा शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषी गजेंद्र जोशी यांचे घरी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भेट देत चर्चा केली. एका खाजगी खोलीत फक्त ना. शिंदे व ज्योतिषी दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. दरम्यान, ना. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत पाचोरा शहरात एक भव्य मंदिराचा प्रकल्प मंजूर केला आहे. तसेच पाचोरा न.पा. डिसेंबर महिन्यात बरखास्त होणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने ही भेट असल्याचे कळते. दरम्यान, दुपारी ना. एकनाथ शिंदे हे रेल्वेने मुंबई रवाना झाले. भेटीप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराब पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे काही नगरसेवक आणि जळगावचे माजी नगरसेवक अमर जैन देखील उपस्थित होते.