मुंबई (वृत्तसंस्था) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. दरम्यान या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात. अभिनंदन टीम इंडिया अशा शब्दात जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे.
तब्बल ४१ वर्षांचा लॉकडाऊन फोडत भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळविलं आहे. त्यामुळे देशभरातून हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच जयंत पाटलांनी हटके शुभेच्छा दिल्याने या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. आज ४१ वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ४१ वर्षांची प्रतिक्षा… प्रयत्न… परिश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकाने देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने ही नवी सुरुवात ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.