सोलापूर (वृत्तसंस्था) पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर विरोधात विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी कोरोना प्रतिबंध नियमांचे तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पक्षाच्या पदधिकाऱ्यांविरोधात सोलापूर शहरातील सदार बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढती महागाई आणि गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर या विरोधात विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने सोलापुरातील डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंपासमोर आज बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या आंदोलनात आमदार प्रणित शिंदे ह्या सहभागी झाल्या होत्या. सोलापूर शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सभा, मोर्चा, आंदोलन करण्यावर बंदी आहे. तरीही, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन या आंदोलनावेळी शिंदे आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
आमदार प्रणिती शिंदे, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरूपती परकीपंडला, मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, सचिन गायकवाड, विकी वाघमारे, देविदास गायकवाड यांच्यासह विद्यार्थी कॉंग्रेसच्या आणखी काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.