कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान त्यांनी मिळवला. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला असून भाजपच्या सत्यजित कदम यांचा त्यांनी पराभूत केलं. या निवडणुकीत जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवत सत्यजित कदम यांचा पराभव केला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७४२६ इतकी मत मिळाली आहे. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार तसेच नगरसेवक असताना महापौर होण्याचा असा दुहेरी मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या.
महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही विजय न मिळाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आशीर्वादानंतर कोल्हापुरातही अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता. पण या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
याचे श्रेय महाविकास आघाडीला – जयश्री जाधव
विजयी उमेदवार जयश्री जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, ‘पण, आज अण्णा सोबत नाहीत याची खंत आहे. त्यांची पावलोपावली आठवण येते. कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्या माघारी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं.’ असे सांगता त्या भावुक झाल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि माझ्या जनतेला माझ्या विजयाचे श्रेय देईन. जनतेने भरभरून मते दिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे. कोल्हापुरच्या स्वाभिमान जनतेने न्याय दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे संस्कार कमी पडलेत, असेही त्या म्हणाल्या.
या निकालाचा नक्कीच २०२४ च्या निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळेल. दरम्यान, या विजयानंतर आता महाविकास आघाडीमध्येच काही राजकीय खलबतं होतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेस उमेदवार उत्तर कोल्हापुरात निवडून आल्यामुळे २०२४ मध्ये काँग्रेस या जागेवर आपला हक्क सांगू शकते. त्यामुळे शिवसेनेसाठी कुठेतरी ही बाब अडचणीची ठरू शकते.