नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा व्हिडिओ शेअर करून काँग्रेसवर निशाणा साधला. आता काँग्रेसनेही भाजपवर पलटवार केला आहे. काँग्रेसने भाजप नेते प्रकाश जावडेकर यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते शॅम्पेनची बाटली उघडताना दिसत आहेत.
काँग्रेस नेते आणि खासदार मणिकम टागोर यांनी प्रकाश जावडेकर यांचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्याचबरोबर हा कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांचा पबमधील व्हिडिओवरून मंगळवारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवरून राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हेकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप असे खासगी विदेशी दौरे आता देशासाठी नवीन नाहीत, अशा शब्दांत रिजिजू यांनी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर पलटवार केला आहे. राहुल गांधी हे नेपाळमध्ये आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. कुणाच्या लग्नात सहभागी होणे हा कोणता गुन्हा नाही. कदाचित यानंतर कुणाशी मैत्री करावी, मित्र कोण असावा, कुणाच्या लग्नात सहभागी होणे बेकायदेशीर आहे, हे भाजपने ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.