मुंबई (वृत्तसंस्था) काश्मिर फाईल्स चित्रपटावरून देशात राजकीय (The Kashmir Files) वातावरण तापले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचं विधान केलंय. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारासाठी चित्रपटामध्ये काँग्रेसलाच दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, हे खोटे आहे. वास्तवात त्यावेळी देशावर काँग्रेसची सत्ताच नव्हती, असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार म्हणाले, नव्वदीच्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे काही झाले, त्याचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटात करण्यात आला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारासाठी चित्रपटामध्ये काँग्रेसलाच दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, हे खोटे आहे. वास्तवात त्यावेळी देशावर काँग्रेसची सत्ताच नव्हती. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले तेव्हा देशात विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार होते. त्यामुळे भाजप सध्या ज्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करत आहे, तो मुद्दाच चुकीचा आहे.
व्ही. पी. सिंह सरकारला भाजपचे समर्थन
पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, काश्मिरी पंडितांचे पलायन झाले, तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या व्ही. पी. सिंह सरकारला भाजपच्याच काही सदस्यांचे समर्थन होते. याचदरम्यान, भाजपच्या मदतीनेच मुफ्ती मोहम्मद सईद केंद्रीय गृहमंत्री बनले होते. आता जे भाजपचे नेते काश्मिरी पंडितांबद्दल कळवळा दाखवून काँग्रेसवर टीका करत आहे, त्यातील काही नेत्यांनीच गृहमंत्री पदासाठी सईद यांना पाठिंबा दिला होता. तसेच, जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल असलेले जगमोहन यांचादेखील काँग्रेसशी काहीही संबंध नव्हता, असेही पवार यांनी स्पष्ट केले.