धरणगाव (प्रतिनिधी) नव्वदच्या दशकात जागतिकीकरणामुळे जागतिक बाजारपेठ जवळ आली म्हणून भांडवलशाही पेक्षा ग्राहकशाहीला महत्व प्राप्त झाले. पूर्वी ग्राहक कंपन्यांकडे जात होता. डिजिटलायजेशनमुळे कंपन्या ग्राहकांपर्यत पोहोचत असल्याने फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत, अशावेळी ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायदा समजून घेऊन न्याय मिळवून घ्यावा,अशी अपेक्षा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात आयोजित सभेत व्याख्यानाप्रसंगी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते हे होते. तर मंचावर पुरवठा निरीक्षक अधिकारी रेवना कांबळे , पुरवठा निरीक्षक किशोर मोरे, पुरवठा सहाय्यक रितेश पवार यांची उपस्थिती होती. डॉ. सोनवणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात ग्राहक चळवळ, हक्क, अधिकार आणि ग्राहक जागृती याविषयी व्यवहारिक जीवनातील उदाहरणे देऊन महत्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. चेतन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजू ओस्तवाल यांनी केले. मान्यवरांचा सत्कार स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष जी.डी.पाटील, उपाध्यक्ष सोपान पाटील, प्रभाकर पाटील, सचिव निलेश ओस्तवाल यांनी केला. याप्रसंगी असंख्य ग्राहक, स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती.