बिजिंग (वृत्तसंस्था) चीनमधून (China) कोरोनाची सुरूवात झाली तिथे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरू केलं आहे. कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या उत्तर भागात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. येथे लाखो लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे येथील नागरिकांची उपासमारीची वेळ आली आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक होणार आहे, त्यामुळे चीनला कोरोना महामारीशी संबंधित परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवायचे आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी येथे कोविड-१९ चे २०९ प्रकरणे नोंदवली गेली. मार्च २०२० नंतर एका दिवसात समोर आलेली ही सर्वाधिक प्रकरणे आहेत.
चीनमधील सियान शहरात काही आठवड्यांपूर्वीच कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. येथे वाहन चालविण्यासही बंदी आहे. याशिवाय येथे घरातील कुण्याही एका सदस्यालाच तीन दिवसांतून एकदाच किराणा सामान आणण्याची परवानगी आहे. शहरातील अनेक जण सोशल मीडियावर अन्न आणि जीवनावश्यक वस्तूं मिळाव्यात यासाठी आवाहन करत आहेत. यांपैकी एकाने वेबसाइटवर लिहिले की, मी उपाशीच मरणार आहे. येथे खाण्यासाठी काहीच नाही आणि घराबाहेर पडू दिले जात नाही. कृपया मदत करा. चीनच्या स्टेट ब्रॉडकॉस्टर CCTV नुसार, या शहरात ४४०० सॅम्पलिंग साइट्स आणि सुमारे १ लाख लोक चाचणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. स्टेट ब्रॉडकॉस्टरने जारी केलेल्या फुटेजमध्ये अनेक भागांत मास्क घातलेले लोक चाचणीसाठी लांबच लांब रांगेत उभे असलेले बघायला मिळत आहेत.















