मुंबई (वृत्तसंस्था) रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
“दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असे वाटत होते. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची पर्वा न करता खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुदा कोरोना चिरडून मरेल असा विनोदही काही लोकांनी केला आहे. कोरोना आहे तसाच आहे. लोकांचे चिरडणे सुरु आहे. दिवाळी सण साजरा करावा हे सगळ्यांनाच वाटते. ही परंपरा आहे. रामायण आणि महाभारत यातून अनेक सण-उत्सवांचा उगम झाला आहे. दिवाळी, दसरा उत्सवही त्यातलेच. राम मंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय श्रीरामचे नारे दिले. पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
चौदा वर्षे वनवास भोगून रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतल्याची आनंदवार्ता हनुमंताने भरताला सांगितली. इतर कुणामुळे आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. अमके तमके मी करीन हा अहंकार फालतू आहे. तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाईल असं म्हणत त्यांनी अर्णब प्रकरणावरुनही भाजपाला सुनावलं आहे. आजच्या सामनातील रोखठोक या सदरात लेख लिहून त्यांनी ही टीका केली आहे.
















