नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन २०२१ एप्रिल सत्राची परीक्षा २७ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.
एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एनटीएनं म्हटलं की, कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहाता उमेदवार आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता एप्रिलमध्ये होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, की कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता मी NTA ला JEE (Main) – २०२१ चं एप्रिलमधील सत्र पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता. आपले विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरबद्दल शिक्षण मंत्रालय आणि मला काळजी आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नव्या तारखेबद्दल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पंधरा दिवस आधी माहिती देण्यात येईल. अधिक अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी NTA ची अधिकृत वेबसाईट तपासत राहाणं गरजेचं आहे.