मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वृत्त कळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधल्याचे कळते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला लढायचं आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना सांगितल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान शरद पवारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळताच सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी त्यांची चौकशी करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार ट्वीटमध्ये काय म्हणाले
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं पवार यांनी २४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पवारांनी केलेल्या ट्विटनंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांना कोरोनावर मात करुन लवकर बरं होण्यासाठी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींबरोबरच काँग्रेसचे महाराष्ट्रामधील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच इतरही नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील फोन करुन शरद पवारांची चौकशी केली आहे. शरद पवारांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे,” असं शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटलांची शरद पवारांसाठी प्रार्थना
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार यांची तब्येत लवकर सुधरावी, अशा सदिच्छा दिल्या. शरद पवार जी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त नुकतेच समजले. ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावे, यासाठी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शरद पवारांची सक्रियता
गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत करोना परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार मैदानात उतरताना दिसले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिवांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी करोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बराच काळापासूनच सुरु असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठीही शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेऊन एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याशिवाय, शरद पवार राज्यातील करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातही होते.