नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अनेक राज्यांत अजूनही कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु आहे. अशा परिस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. “मागच्या २४ तासात ५ लाख नविन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय कोरोना कमी होण्याची लक्षणं नाहीत”, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक विषाणू आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण कोरोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ इतकं आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून घरातच असणाऱ्या लोकांना मानसिक थकवा जाणवत आहे. त्यामुळे ते सक्तीने बाहेर पडत समाजामध्ये मिसळत आहेत. मात्र संपर्क वाढल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यात अनेक देशांनी कोरोनावरील निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं बंधनकारण नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक देशात लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने मृत्यूदर वाढला आहे.
कोव्हॅक्सिन कोरोनावर प्रभावशाली असल्याचं देखील सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. या लसीचा प्रभाव चांगला दिसत आहे. कोव्हॅक्सिनच्या ३ टप्प्यातील अहवालाचा अभ्यास सुरु आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला जागतिक परवानगी मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
अनेक देशात निर्बंध हटवले
अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना आटोक्यात आल्यामुळं मास्कची सक्ती हटवण्यात आली आहे. बाजारपेठा सुरू होत आहेत. अशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या शक्यतेमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.















