पुणे (वृत्तसंस्था) बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करवून घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोव्हिड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र, सरकारने ही सेंटर्स बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना चालवायला दिली आहेत. ज्यांचे चित्रपट कधी चालले नाहीत त्यांना आता कोव्हिड सेंटर आणि सॅनिटायझर तयार करण्याचे कंत्राट दिले जात आहे. बॉलीवूडमधील लोकांना फायदा मिळवून देण्यासाठीच ही कंत्राटे काढली जात असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीवरूनही सरकारला लक्ष्य केले. राज्यात इमारती, रुग्णालय आणि मॉल्समध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. इमारतींमध्ये अग्निरोधक सुविधा उपलब्ध नसल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात अपयश येत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही हे फायर ऑडिट झालेले नाही. परिस्थिती बदलली नसल्याने आगीच्या दुर्घटनेत निष्पापांचे बळी जात आहेत. त्याची जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश राणे यांनी केली.