नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी गाईचे शेण आणि गोमुत्राचा योग्य वापर केल्यास अर्थव्यवस्था मजबूत होऊन देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल, असे विधान केले आहे. त्यांच्या या अजब वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. ते इंडियन व्हेटरनरी असोसिएशनच्या महिला विभागाच्या संमेलनात बोलत होते.
एका वृत्तसंस्थाने शिवराज सिंह यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील शेअर केलाय. त्यात ते गाईच्या शेणाचं आणि गोमुत्राचं महत्त्व सांगताना दिसत आहेत. शिवराज सिंह म्हणाले, “गाय, गाईचं शेण, गोमुत्रापासून आपण आपल्या अर्थव्यवस्थेला देखील मजबूत बनवून देशाला आर्थिकदृष्टीने सक्षम बनवू शकतो. आपल्याला ते करावं लागेल. आज नाही तर उद्या आपल्याला यश मिळणार हे निश्चित आहे. गोवंशाच्या गोमुत्रापासून खत, किटकनाशक, औषधं अशा अनेक गोष्टी तयार करता येतात. सध्या आम्ही मध्य प्रदेशच्या स्मशानभूमींमध्ये लाकूड जाळलं जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
“गाय बैलाशिवाय काम होऊ शकत नाही. सरकारनं यासाठी गोशाळा आणि अभयारण्य तयार केले. मात्र, जोपर्यंत लोक यात सहभागी होत नाही तोपर्यंत केवळ गोशाळा निर्माण करून यश येणार नाही. आम्ही मध्य प्रदेशमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असंही शिवराज सिंह यांनी नमूद केलं.