मुंबई (वृत्तसंस्था) मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथे उघडकीस आली आहे. चांगुणा नामदेव खोत (६५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (२७) यास पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आईने जेवण दिले नाही म्हणून जयेशने किरकोळ वाद घातला. यावेळी माय-लेकामध्ये शाब्दिक चकमक झाली. याचवेळी रागाच्या भरात जयेशने लाकडी दांडक्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोयत्याने मारत त्याने आपल्या आईला फरफरट घराबाहेर अंगणात आणले. आईला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावरती पालापाचोळा टाकून तिला जिवंत जाळले.
गावातील लोकांना महिती मिळताच पोलिसांना कळवले. रेवदंडा पोलिसांनी तत्काळ गावात जाऊन माहिती घेतली आणि जयेशला ताब्यात घेतले. जखमी चांगुणा खोत यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जयेश खोत याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जयेश खोत हा उच्चशिक्षित तरूण आहे, त्याने आयटीआयचे शिक्षण पुर्ण केले आहे. मात्र नोकरी नसल्याने तो घरीच असतो. तर त्याचा एक भाऊ गतिमंद असल्याचे कळते. दरम्यान, जेवण दिलं नाही, या किरकोळ विषयातून पोटच्या मुलाने आईला जिवंत जाळल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.