मुंबई (वृत्तसंस्था) भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. दारूच्या नशेत राहत्या सोसाटीतील रहिवाशाच्या गाडीला धडक मारल्याची तक्रार विनोद कांबळीविरोधात नोंदवण्यात आली आहे.
वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या 279, 336 आणि 427 कलमांसह मोटरव्हेईकल अॅक्ट १८५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कांबळीला अटक केली आहे. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आलं आहे. याबाबतचा अधिक तपास वांद्रे पोलिस करत आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विनोद कांबळीची सायबर चोरट्याकडून फसवणूक झाल्याची घटना घडली होती. विनोद कांबळीच्या खात्यातून तब्बल १ लाख १४ हजार सायबर चोरट्यांनी चोरले होते. ३ डिसेंबर रोजी कांबळी यांच्या मोबाइलवर एक निनावी फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगितलं होतं. तसेच बँकेची KYC अपडेट नसल्याचे सांगितलं होतं. जर हे KYC अपडेट केले नाहीत तर व्यवहार ठप्प होण्याची भीती या चोरट्यांनी कांबळी यांना घातली होती. त्यावर कांबळी यांनी विश्वास ठेवल्याने कांबळी अलगद चोरट्यांच्या जाळ्यात अडकले होते.