नागपुर (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी नागपुरात फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी ते रात्री १० अशी ठरवून दिली आहे. त्यामुळे आता रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर थेट पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी देखील फक्त ग्रीन फटाक्यांची खरेदी आणि विक्री करावी, तसेच ग्राहकांनीही फटाके विकत घेताना, ते ग्रीन फटाके आहेत की नाही? याची खातरजमा करावी, असं आव्हान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात सर्रास फटाके विक्री सुरु असून लोकंही वेळ न पाळता फटाके फोडत आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडणाऱ्यां विरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी शहरात ३३ विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. काल (मंगळवारी) रात्री चार ठिकाणी पोलिसांनी कारवाईसुद्धा केली आहे. यासोबतच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे.