वाराणसी (वृत्तसंस्था) येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असताना याठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं. इतकचं नाही तर मोदी भाषण करतानाही अनेकजण निघून जात होते. एका माजी आयएएस अधिकाऱ्यानं या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपला चिमटा काढला आहे.
मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात बूथ विजय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात हा प्रकार घडला. वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते. ते सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत होते. परंतु मोदी यांचे भाषण सुरु होताच अनेकजण खुर्ची सोडून जाताना दिसले. बूथ विजय संमेलनात भाजपा पदाधिकाऱ्यांना मोदी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचं मंत्र देत होते. परंतु हा कार्यक्रम अर्धा तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते वाट पाहून थकले होते. त्यामुळे जेव्हा मोदींचे भाषण सुरू झाले तेव्हा ते अर्धवट सोडून अनेकजण माघारी परतले.
माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रतापसिंह यांनी ट्विटरवर मोदींच्या सभेतील गर्दीचा व्हिडिओ शेअर करत भाजपला चिमटा काढला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज ऐकायला येत असून रिकाम्या खुर्च्याही दिसून येत आहेत. भीड का महाप्रलय काशी मे आवाज जानी पहचानी है सुन तो लो… असे कॅप्शन देत सिंह यांनी मोदींच्या सभेची खिल्ली उडवली आहे. तसेच, टेलिप्रॉम्पटर बाबा काशी मे… असेही त्यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या सभेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर झाले आहेत.