मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. त्यात आता एनसीबीची एक टीम अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या निवासस्थानी दाखल झाली. मन्नत निवासस्थानी जवळपास अर्धा तास एनसीबीची टीम उपस्थित होती. दरम्यान, एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.
अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावरही छापा
एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.
शाहरुख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात
बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे गुरुवारी सकाळी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहचला होता. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.