वर्धा (वृत्तसंस्था) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नागरी सहकारी बँकेच्या शाखेतील नागरिकांच्या जमा पैसे युटिलिटी हॅक करीत १४ तासात २४ विविध बँक खात्यात सव्वा कोटी रुपयांची रक्कम हॅकर्सने ऑनलाईन वळती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वर्ध्यातील नागरी सहकारी बँकेत अनेक खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली आहे. एस बँकेच्या मदतीने आरटीजीएस व्यवहार केले जातात. २४ मे रोजी बँक बंद असल्याने सकाळी ६ ते रात्री ८ वाजताच्या सुमारास अज्ञात हॅकर्सने एस बँकेची युटिलिटी हॅक करीत बँक खात्यात जमा असलेल्या १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. हॅकर्सने २४ विविध बँक खात्यात ही रक्कम ऑनलाईन वळती केली. दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी बँक उघडल्यावर सर्व संगणक सुरु केल्यावर हा प्रकार लक्षात आला. अधिक माहिती घेतली असता सायबर भामट्याने सकाळी ६:०७ ते ८:२६ मिनिटांपर्यंत एकूण २४ विविध खात्यांत ही रक्कम वळती केल्याचे दिसले. मात्र, याच्या नोंदी कोअर बँकिंगप्रणालीत दिसून आल्या नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँक ही रिझर्व्ह बँकेकडून परवाना प्राप्त बँक आहे. ही बँक वर्धा जिल्ह्यात बँकिंग व्यवसाय करते. बँकेचे सॉफ्टवेअर मे. नेलिटो सिस्टम्स प्रा.लि. मुंबई यांच्याकडून घेतलेले आहे. बँकेच्या खात्यातून रक्कम इतर खात्यांत वळती होताच याबाबत रिझर्व्ह बँकेला याची माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ३० लाखांची रक्कम ब्लॉक केली आहे. तर २४ विविध खात्यांत वळती करण्यात आलेली रक्कम ही ब्लॉक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे कळतेय.