जुन्नर (वृत्तसंस्था) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्चित केलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाष्य करत, आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचे सांगितले. ते आज आंबेगाव तालुक्याच्या दौरावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज आंबेगाव तालुक्याच्या दौरावर होते. या दरम्यान माध्यमांशी बोलत असताना वळसे पाटील यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. ‘देशात नवीन वातावरण असून विचार स्वातंत्र्यावर आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांचा विचारच संपवायचं, त्यांना जगू द्यायचे नाही त्रास द्यायचा अशा विचारधारा देशात रुजली आहे त्यातूनच दाभोळकर हत्या प्रकरण घडले, असं स्पष्ट मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी व्यक्त केलं.
तसंच,नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख पटली आहे, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता आरोपींवर कठोर शिक्षा होणार आहे, असंही वळसे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MIM सोबत युती करणार नसल्याचं जाहीर केल्या नंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत MIM येणार का नाही या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे माध्यमांसोबत बोलतील असं म्हणत Mim सोबत युतीबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला.