धरणगाव (प्रतिनिधी) खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दादर–भुसावळ दरम्यान धावणारी विशेष गाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली असून, ती 19047/48 दादर–भुसावळ एक्सप्रेस या नव्या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे तिकीट दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फायदा होईल. खानदेशातील अनेक प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करत असल्याने ही सेवा अधिक उपयुक्त ठरणार आहे.
या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच खानदेशच्या लोकप्रिय खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे ही मागणी पूर्ण झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर, डीआरएम व संबंधित अधिकाऱ्यांचेही खानदेशवासीयांकडून आभार मानण्यात आले आहेत.
दरम्यान, पश्चिम रेल्वेचे ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.”












