कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) येथील स्टेशनरोड व स्वामी समर्थ नगर परिसरात एकाच रात्रीत दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एका ठिकाणी दीड लाख रुपये चोरट्यांनी लांबवले. तर दुसऱ्या ठिकाणी घर मालकास जाग आल्याने चोरट्यांनी खालीहात पळ काढला. या घटनांमुळे नागरिकात धास्तावले असून घटनास्थळी भडगाव पोलिसांनी भेट दिली.
स्वामी समर्थ नगरात किराणा व्यापारी नरसिंगराम चौधरी हे राहतात. २५ रोजी मध्यरात्री दरवाजावर काही आवाज येत असल्याने ते जागे झाले. घर मालक जागे झाल्याचे चोरटयांना लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, तेथून १०० मीटर अंतरावरील दर्शन ऑटोपार्टसच्या गोदामाचा कडीकोंडा चोरट्यांनी तोडला. या ठिकाणी व्यापाऱ्यांना देण्यासाठी ठेवलेले दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी ड्रॉवर तोडून लांबवली.
ही घटना दुकान मालक शुभम हिरण व दर्शन हिरण या बंधुना सकाळी गोदाम उघडतांना लक्षात आली. त्यांनी या संदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी फौजदार शेखर डोमाळे, गोपनीय शाखेचे स्वप्नील चव्हाण, संभाजी पाटील, कजगा पोलीस मदत केंद्राचे नरेंद्र विसपुते यांना पाठवले. त्यांनी भेट देऊन पंचनामा केला. तर ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. श्वानाने रेल्वे स्टेशनच्या जिन्यापर्यंत मग दाखवला.