जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले असता, मालक ट्रॅक्टर घेवून पळून जात होता. पथकाने त्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र वाळूमाफियाने भरधाव ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या वाहनाला जोरात धडक देत त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २८ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आव्हाणे शिवारातील कचरा फॅक्टरीजवळ घडली. यामध्ये तहसीलदारांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील नवीन राष्ट्रीय महामार्गाजवळील उड्डाणपुलाजवळून गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईसाठी तहसीलदार शितल राजपूत यांनी शिरसोली प्र.न येथील तलाठी मयूर महाले हे महसूल विभागाचे अधिकारी अनघा घोटगे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत बडगुजर, नितीन भोई यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. कचरा फॅक्टरीकडून आव्हाणे रोडकडे येत असलेल्या (एमएच २८, डी ९६२९) क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि (एमएच २८, बीक्यू ६३९६) क्रमांकाची ट्रॉलीतून वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला पथकाने थांबविताच चालक तेथून पळून गेला. यावेळी शिरसोली येथील मंडळ अधिकारी सारीका दुरगुडे हे (एमएच १९, ईए ९५५८) क्रमांकाच्या शासकीय वाहनाने याठिकाणी आले.
कारवाई करीत असतांना देवा रा. जैनाबाद नामक व्यक्ती त्याठिकाणी आला. त्याने ट्रॅक्टर त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितल्यानंतर महसूलच्या पथकाने त्याला ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले. मात्र ट्रॅक्टर मालकाने वाळूचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने कानळदा-जळगावकडे जाणाऱ्या रस्त्याने भरधाव वेगाने पळून जात होता.
महसूलच्या पथकाने पळून जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत वाहन ) ट्रॅक्टरपुढे थांबवले. मात्र ट्रॅक्टर चालकाने वाहनाचा वेग वाढवून पथकाला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचे नुकसान झाले असून कोणाला काहीही दुखापत झालेली नाही. त्यानंतर पथकाने ते ट्रॅक्टर जप्त केले असून वाळूमाफियाविरुद्ध तालुका पोलिसात प्राणघातक हल्ल्यासह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.