चोपडा (प्रतिनिधी) ”मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…” प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या या ओळी कोणाच्याही मृत्यूनंतर सहज सुचतात. पण चोपडा तालुक्यातील धुपे स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा रस्ता बघितला, तर ”मरणाने केली सुटका, स्मशानभूमीने छळले आहे…” अशाच प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते!’ प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या गझलेतील एक कडवं. मात्र काहींच्या बाबतीत मरणानंतरही छळ संपत नाही. तालुक्यातील तापी काठावरील धुपे या गावातील नागरिकांच्या ही गोष्ट लागू होत आहे. धुपे हे पुनर्वसित गाव असून येथून जुन्या गावापर्यंत जाण्याच्या रस्ता आहे की नाही?, असा प्रश्न पडावा, एवढी दुरावस्था झाली आहे.
धुपे गावात नुकतच एका व्यक्तीचे दु:खद निधन झाले. परंतू मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांचे अक्षरशा: हाल बेहाल झाले. यामुळे प्रेताची अवहेलना झाली. स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अखेर जवळच्या एका शेतात अंत्यविधी करण्यासाठी शेतकऱ्याला विनवण्या कराव्या लागल्यात. तालुक्यातील धुपे गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा आहे. परंतू त्या जागेपर्यंत देखील मृतदेह घेऊन जाणे शक्य झाले नाही. कारण पावसामुळे रस्त्यावर अक्षरशा गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे.
गावातील रोहिदास कोळी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा मात्र, अंत्यसंस्कार करण्याच्या जागेपर्यंत नेता आली नाही. काही अंतरापर्यंतच अंत्ययात्रा घेऊन गेल्यानंतर पुढे जाणं अशक्य असल्याने काय करावे?, या विवेचनेत सर्व ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले. यानंतर काही जणांनी जवळच्याच शेतालगत अंतिमसंस्कार करण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर संबंधित शेतकरी अशोक अभिमन कोळी यांना विनंती केल्यानंतर त्यांनी होकार दिला. आपल्या उभ्या पिकात प्रेत दफन करण्यासाठी होकार दिल्यामुळे रोहिदास कोळी यांच्यावर अंतिम संस्कार होऊ शकले.
धुपे गाव पुनर्वसित केल्यानंतरही गावाच्या आजूबाजूचे रस्ते हे पुनर्वसीत झाले नसल्याने शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. याकडे मात्र, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होता आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मंत्री व नवीनच आलेले तिसरे मंत्री अनिल पाटील हे असल्यावर देखील मृतदेहाची एवढी अवहेलना होणे, ही संतापजनक घटना आहे. या घटनेपासून तरी बोध घेऊन प्रशासनाने रस्ता बनवावा ही मागणी धुपे वाशियांची आहे. वरील सविस्तर माहिती पत्रकारांना चेतन बोरसे व वेले येथील माजी उपसरपंच बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते दीपक पाटील यांनी दिली.