नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. NIA च्या मुंबई ब्रांचला हा धमकीचा मेल आला आहे. 20 किलो RDX ने मोदींवर हल्ला करणार असल्याचे मेलमध्ये म्हंटल आहे. सदर मेल करणाऱ्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.
धमकीच्या मेलचा अधिक तपास करण्यात येत आहे. या मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचेही मेलमध्ये म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे, धमकी देणाऱ्याने दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावाही केलाय. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि ते कुठून पाठवले आहे, याचा तपास सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. तसेच एनआयएने या मेलची माहिती इतर सुरक्षा यंत्रणांनाही पाठवली आहे. एनआयएने या प्रकरणाचा तपासही सुरू केलाय. याआधीही अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेला होता.