भुसावळ (प्रतिनिधी) एका महिलेची ६० लाख ७० हजार रुपयांची फसवणूकी करत तिला धमकी दिल्याप्रकरणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
ममता सुधाकर सनासे (रा.सद्गुरू हौसिंग सोसायटी पूजा कॉपलेस मागे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, चौधरी यांनी त्यांच्या मालकीचे वेंकटेश कॉम्प्लेक्समधील गाळे विक्रीचे आमिष दाखवले व त्यांच्याकडून ६० लाख ७० हजार रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन फसवणूक केली. हा व्यवहार गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आला होता. त्यावेळी अनिल चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित होते. गाळे खरेदी करण्यासाठी त्यावेळी गाळे मालक चौधरी व घेणारे सनांसे हे निबंधक कार्यालयात खरेदी करण्यासाठी गेले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत असल्यामुळे त्यावेळी चौधरी यांनी प्रचाराला जायचे असल्याचे कारण सांगून निघून गेले होते. तोपर्यंत त्यांनी महिलेकडून पैसे घेऊन प्रचारात व्यस्त झाले होते. यासंदर्भात सनान्से यांनी अपर पोलीस अधीक्षक व तत्कालीन डीवायएसपी राठोड यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे ममता सनान्से यांनी पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ७ सप्टेंबर रोजी पत्र देऊन तक्रार केली होती. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मुंडे यांनी अर्जाची चौकशी करण्यासाठी आदेश दिले होते. अनिल चौधरी यांनी ऑक्टोबर २७ रोजी जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद ममता सनान्से यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली. यावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौधरीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू चौधरींविरूद्ध भादवि कलम ४२०,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करत आहेत.