कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील सुधाकर नगरमध्ये राहणारे दीपक भगीरथ पांडे हे वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता मिळण्यासाठी एरंडोल येथील तहसील कार्यालयाजवळ दि. १४ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कासोदा येथील दीपक पांडे यांनी तहसीलदार यांना त्यांचे कासोदा शिवारात गट नंबर ३२ येथे वडिलोपार्जित वारसा हक्काने मिळालेली शेती आहे. त्या शेतीत वहिवाटीच्या रस्त्यासाठी एरंडोल येथील तहसीलदार एरंडोल यांच्या कोर्टात केस दाखल केले असता तहसीलदार एरंडोल यांनी स्थळ निरीक्षणासाठी प्रत्यक्ष आले असता त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुद्धा निकाल उपोषण करणारे पांडे यांचे विरुद्ध दिला आहे. त्याठिकाणी रस्त्यावर गट क्रमांक ३० असून सदर संपूर्ण गट प्रतिवादी यांनी बिनशेती केलेली असून प्लॉट्स पाडलेले आहेत. त्यामुळे जर वडीलोपार्जित रस्त्यावरचे प्लॉट विकले गेले तर मला गट क्रमांक ३२ मध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मी नाइलाजास्तव तहसीलदार यांनी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध दि. १४ ऑगस्ट शनिवारी या दिवशी तहसील कार्यालयाजवळ मला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. असे लेखी निवेदने त्यांनी जिल्हाधिकारी यांना देऊन कळवले आहेत व त्याच्या प्रती त्यांनी पंतप्रधान कार्यालय दिल्ली, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,पोलीस अधीक्षक जळगाव ,प्रांत एरंडोल, तहसीलदार एरंडोल, पोलीस निरीक्षक एरंडोल यांना रवाना केल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.