नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील एका गावात नात्याने सख्खी मावशी आणि चुलती लागणाऱ्या एका महिलेनं १३ वर्षीय अल्पवयीन मुलाची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. दरम्यान, या आरोपी महिलेने स्वत: माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग रामचंद्र नागसाखरे असं हत्या झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तर अरुणा सोमेश्वर नागसाखरे असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी महिला ही मूळची खेडकरवाडी येथील असून तिचे माहेर कामजळगेवाडी आहे. आरोपी महिलेनं नात्याने सख्ख्या बहिणीचा मुलगा आणि पुतण्या असलेल्या १३ वर्षीय सुयोग रामचंद्र नागसाखरे याची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. संबंधित घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
पुतण्याची हत्या केल्यानंतर, आरोपी महिला स्वत: माळाकोळी पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाली आहे. तिने खुनाची कबुली दिली आहे. तिने नेमक्या कोणत्या कारणातून पुतण्याची हत्या केली, याबाबत अद्याप कोणताही खुलासा झाला नाही. मृत मुलाचे वडील रामचंद्र नागसाखरे यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.