जळगाव (प्रतिनिधी) माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरची टीप ही थेट पोलिसांना दिल्लीहून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी थेट फार्महाऊसवर छापा टाकीत कॉल सेंटरवरचा पर्दाफाश केला. त्यामुळे या कारवाईचे दिल्ली कनेक्शन उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील ममुराबाद रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकीत पर्दाफाश केला. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कॉल सेंटवरमधून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून पोलीस माहिती संकलीत करीत आहे. तसेच बनावट कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांच्या घराची सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. परंतु पोलिसांना या गुन्ह्याशी संबंधित काहीही मिळून न आल्याने पोलिसांना माघारी फिरावे लागले.
इगतपुरीच्या कारवाईनंतर मिळाली टीप
बनावट कॉल सेंटर मधून अमेरिका, कॅनडा या देशातील नागरिकांना गंडा घालून पैसे हवाला द्वारे मुंबईत आणण्याचे रॅकेट यामध्ये सुरू होते. याची माहिती दिल्ली पर्यत पोहचली होती. तसेच गेल्या काही दिवसांपुर्वी इगतपुरी येथे सीबीआयच्या पथकाने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर जळगावच्या कॉल सेंटरवर कारवाईची करण्याची टीप पोलिसांना मिळाली होती.
वादानंतर कॉल सेंटर झाले स्थालांतरीत
ममुराबाद रोडवर सुरु असेले कॉल सेंटर हे काही महिन्यांपासून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होते. मात्र तेथे आर्थीक कारणावरुन वाद झाल्यानंतर ते कॉल सेंटर हे एमआयडीतून ममुराबादरस्त्यावरील फार्म हाऊसवर स्थालांतरीत केले. स्थालांतरणाचे करण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर दि. ९ सप्टेंबर पासून ते कार्यान्वयीत झाले होते. कॉल सेंटर सुरु झाल्यानंतर त्याची माहिती दिल्लीतील यंत्रणेला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पथक मुंबईत ठाण मांडून
कॉल सेंटर प्रकरणातील मुंबईतील मुख्य सूत्रधारांची ओळख पटली असून ते फरार झाले आहे. त्यांच्या शोधार्थ एलसबीचे पथक दोन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून असून, इतर कर्मचाऱ्यांना देखील मुंबई येथे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
















